Saturday, 14 April 2012

सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार


सोमनाथचे श्रममूल्यसंस्कार




डॉ. गिरीश कुलकर्णी ,रविवार ८ एप्रिल २०१२
altगोव्यात बेकायदा खाणींविरुद्ध आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रा. राजेंद्र व पौर्णिमा केरकर दाम्पत्य जिवावर उदार होऊन लढते आहे. मेळघाटात आदिवासी बालकांचे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांवर डॉ. कविता आणि डॉ. आशीष सातव पथदर्शी काम करीत आहेत. मध्य प्रदेशच्या ग्रामीण आदिवासी भागात ‘समाज प्रगती सहयोग’ ही भारतातील दहा राज्यांतील उच्चविद्याविभूषित तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था पाणलोट क्षेत्र विकास व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणीद्वारे समग्र परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिते आहे. अंध आणि अपंगांसाठी मध्य महाराष्ट्रात अजित कुलकर्णी समर्पित वृत्तीने ‘अनाम-प्रेम’ या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. अहमदनगरमध्ये अंबादास चव्हाण, अनिल गावडे, अजय वाबळे, वैजनाथ लोहार, प्रवीण मुत्याल, मीनाताई altशिंदे, संगीता शेलार ‘स्नेहालय’च्या नव्या प्रकल्पांद्वारे एच.आय.व्ही.- एड्सबाधित वेश्या, वंचित बालके यांच्या पुनर्वसनाचे पथदर्शी प्रकल्प उभारत आहेत. हनीफ शेख आणि राजीव गुजर नगरमध्येच आठ झोपडपट्टय़ांतील सुमारे दोन हजारांवर वंचित बालकांचे जीवन बदलण्यासाठी ‘बालभवन’ या प्रकल्पाद्वारे एक अभिनव प्रयोग करीत आहेत. बीड जिल्ह्य़ात गेवराई तालुक्यात एच.आय.व्ही.- एड्सबाधित बालकांसाठी संतोष गर्जे ‘सहारा अनाथालय’ चालवतो आहे. संगमनेरला राजा अवसक धनदांडग्या राजकारण्यांविरुद्ध गरीबांच्या हक्कांची लढाई लढतो आहे. खांडगावला संतोष पवार वेश्यांची आणि एड्सबाधित मुले सांभाळतो आहे. ठाण्याचा सुयोग मराठे आपल्या पीएच.डी.चा अभ्यास सांभाळत ग्रामीण भागात तरुणांसाठी श्रमसंस्कार शिबिरे आयोजित करतो. पुण्याजवळ उरळी कांचन येथे डॉ. अनिल कुडिया आपली सुपर क्लास वनची नोकरी पणाला लावून पुण्यातील व्यसनाधीन आणि लालबत्ती भागातील बालकांचा र्सवकष विकास घडवतो आहे. दिल्लीत ‘गुंज’ ही संस्था उभी करून अंशू आणि मीनाक्षी गुप्ता या दाम्पत्याने वनाधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मॅगसेसे पुरस्कार मिळविणारी नीलिमा मिश्रा जळगाव जिल्ह्य़ातील बहादरपूरला स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी ग्राम बनविण्यासाठी एक दशकापासून अविरत झटते आहे. श्रीगोंदा येथे अनंत झेंडे हा मुलगा महामानव बाबा आमटे विद्यार्थी सहाय्यक समितीद्वारे २५ गरीब, गरजू विद्यार्थ्यांना जीवनमूल्य आणि जगण्याचे ध्येय देत शिक्षणाला आधार देत आहे.. अशी ही यादी न संपणारी आहे. 
altआज देशातील कानाकोपऱ्यात सेवाकार्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले असंख्य तरुण-तरुणी लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. त्यांच्या या रचनात्मक धडपडीमागे प्रेरणेचा आणि ऊर्मीचा एक समान धागा आहे. ज्याचे नाव- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्याप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, त्यांच्या सहवासातून आणि त्यांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरांतून!
देशातील प्रत्येक राज्यात असे सेवाकार्याच्या ध्यासाने पेटलेले तरुण-तरुणी आपापल्या पंचक्रोशीतील भेडसावणाऱ्या प्रश्नांना पूर्ण ताकदीने भिडलेले दिसतात. कुठे संघर्ष झडतो आहे, कुठे रचनेचा आविष्कार अंकुरतो आहे, कुठे रचना आणि संघर्षांचा योग्य मेळ घालून व्यवस्थेवर परिवर्तनासाठी दबाव तयार केला जातो आहे. यातील बहुतांश तरुण-तरुणींनी वयाच्या विशीतच वेगळ्या वाटेने जगणे सुरू केले आणि वयाची चाळिशी समोर उभी असताना समाजाचा सहयोग आणि पाठबळ मिळवून सशक्त संस्थाही उभ्या केल्या आहेत. या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्याची प्रेरणा जाणून घेतल्यावर जाणवते की, अशा हजारो धडपडींमागे एका समान प्रेरणेचा आणि ऊर्मीचा धागा आहे. ज्याचे नाव आहे- बाबा आमटे. अशा अनेक तरुण कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली ती बाबांच्या कामातून, सहवासातून आणि बाबांनी प्रज्ज्वलित केलेल्या सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीच्या धगधगत्या अग्निकुंडातून!
आपला देश सध्या संक्रमणावस्थेतून चालला आहे. अस्वस्थ करणारे समाजातील अनेक नवे बदल आपल्याला सतावत आहेत. देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या समíपत देशभक्तांचा क्रांतिवाद आणि त्याग आजच्या तरुणाईतून जणू लुप्त झाल्याची शंका येते. सतत एस.एम.एस., ई-मेल, फेसबुकमध्ये दंग असणाऱ्या आजच्या तरुणाईला आपल्याच समाजातील करोडो शोषित, वंचितांच्या नरकमय जीवनाची किंचितही जाणीव असू नये, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण निराशेचे हे मळभ एका निरलस सेवा परंपरेला आपण सजगपणे स्मरतो तेव्हा दूर होते. ‘पेरते व्हा..’ हा आश्वासक भाव आपल्या मनात प्रज्ज्वलित करणारे हे अग्निकुंड म्हणजेच महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पातर्फे दरवर्षी आयोजिली जाणारी सोमनाथची श्रमसंस्कार छावणी! यंदाही संवेदनशील आणि कृतिशील तरुणाईला १५ ते २२ मे या काळात जीवन संपन्न करणाऱ्या या छावणीच्या अनोख्या अनुभूतीची संधी मिळणार आहे.
१९६७ साली बाबा आमटे या द्रष्टय़ा महामानवाने चंद्रपूर जिल्ह्य़ातील सोमनाथच्या जंगलात ही सेवाकार्याची धुनी प्रज्वलित केली. गेली ४५ वष्रे देशभरातले स्वप्नं पाहणारे आणि त्या स्वप्नासाठीच जगू इच्छिणारे हजारो तरुण-तरुणी इथे एकत्र येतात. इथल्या यज्ञकुंडातील निखारे हृदयात भरून परततात. आपल्या क्षमता एकवटतात आणि त्या समाजासाठी विकसित करतात. श्रमाची प्रतिष्ठा आणि सामूहिक श्रमाचे मोल जाणतात. याच सेवा परंपरेतून आणि प्रेरणेतून भारताच्या नवनिर्माणाचे असंख्य प्रयोग देशभर ठिकठिकाणी सुरू आहेत.
बाबांनी सोमनाथचा श्रमसंस्कार ‘याग’ सुरू केला तेव्हा ‘एन. जी. ओ.’ हा शब्द किंवा ‘एन. जी. ओ. संस्कृती’ आजच्या एवढी प्रचलित नव्हती. या श्रमसंस्कार छावणीमुळे गेल्या चार दशकांत उपेक्षित, सर्वहारा, सर्वघृणित समूहांमधील ‘माणूस’ जागा करण्याची प्रेरणा तरुणाईला मिळाली. मानव्याची आणि स्वीकाराची पहाट शतकानुशतके काळोखातच पिचलेल्या माणसांच्या आयुष्यात उगवली. देशभर भारलेल्या तरुणाईमुळे अक्षरश: हजारो प्रकाशाची बेटं प्रज्ज्वलित झाली. अंधाराला चिरत उज्ज्वल उदयाची आशा येथील श्रमसंस्कारांमुळे शिबिरार्थीत प्रखर झाली. या श्रमसंस्कार छावणीत जो येतो, तो बदलतोच. जो स्वत: बदलतो, तो वेगळ्या पद्धतीने जगण्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीने समाजासाठी श्रमण्याचा निर्धार करतो.. श्रमालाच परमेश्वर मानतो आणि त्यातून आपल्या समाजात, पंचक्रोशीत सकारात्मक बदल घडवतो. वेगळ्या पायवाटा मळण्यासाठी आतुर असलेल्या, एका वेगळ्या आव्हानात्मक, अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न अशा आयुष्याचा शोध घेणाऱ्या मनस्वी तरुणाईला सोमनाथची श्रमसंस्कार छावणी नित्य साद घालत आली आहे. आशयसंपन्न जीवनाचा आयुष्यात शोध न लागलेले ‘सत्तरीचे तरुण’ही छावणीत येतात. परंतु सोमनाथला घनदाट जंगल आहे. येथे उन्हाचा कडाका असतो. तो झेपण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असायला हवी. दरवर्षी १५ ते २२ मेपर्यंत चालणाऱ्या या श्रमसंस्कार छावणीत केवळ वेगळ्या, जंगलानुभवाच्या, पर्यटनाच्या अपेक्षेने कोणी येईल तर मात्र त्याची निराशा होईल. नवनिर्माणाच्या आव्हानासाठी आसुसलेल्या तारुण्यसुलभ संघर्षांची अनिवार ऊर्मी तुम्ही उरात बाळगून असाल तर मात्र सोमनाथच्या श्रमसंस्कार छावणीचे हे निमंत्रण खास तुमच्यासाठीच आहे.
बाबा आमटे शब्दप्रभूही होते. ते म्हणायचे, ‘सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. थोर श्रद्धा आणि ध्येयांना महान अग्निदिव्यातून जावे लागते.’ अशी विचारधारा तरुणाईला देणाऱ्या बाबांनी समाजाने झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांच्या सर्वागीण पुनरुत्थानासाठी १९४९ साली आनंदवनाची स्थापना करून करुणेचा कलाम जगाला दिला. सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा इत्यादी प्रकल्पांतून सेवेचे यज्ञकुंड बाबांनी सुरू केले. समाजातील जवळपास सर्वच वंचित, उपेक्षित घटकांच्या जीवनाला स्पर्शणारे उपक्रम बाबांनी सुरू केले. कुष्ठरुग्ण, अंध, मूकबधिर, बहुविकलांग, वृद्ध, आदिवासी समस्याग्रस्तांसाठी या प्रकल्पांत हक्काचे घर आणि परिवार बाबांनी बनवला. म्हणूनच ‘सेवाकार्याची समग्र गीता’असे आनंदवन प्रयोगाला म्हटले गेले.
समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोग्यांसह कार्य उभारत असताना लोक बाबांची पाठीमागे टवाळी करायचे. ध्येयासक्तबाबांना मात्र कोण काय म्हणतो, याची कधीही फिकीर नव्हती. बाबा म्हणायचे, ‘जोपर्यंत समाजातील युवक जागा होत नाही, तोपर्यंत समाजातील दैन्य, वेदना आणि अश्रू संपूच शकत नाहीत.’ या चिंतनातून त्यांनी ‘हाथ लगे निर्माण में, नही माँगने, नहीं मारने’ हा मंत्र युवा पिढीला दिला. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी हे समाजाचे दोन मुख्य घटक. या दोन्हीमधील दरी जशी रुंदावत जाईल, तशी सामाजिक-आíथक विषमता आणि शोषण समाजाचा विनाश घडवील, असे बाबा म्हणायचे. श्रम आणि श्रमिकाला तुच्छ लेखणारा समाज असंस्कृत आणि अज्ञानी असतो, तो कधीच प्रगतिशील नसतो, असे ठणकावणारे बाबा स्वत: एक ‘श्रम-बुद्धिजीवी’ होते. म्हणूनच बाबांनी विद्यादान करणाऱ्या विद्यापीठांबरोबरच श्रमाचे आणि सेवेचे महत्त्व तसेच संस्कार देणारे विद्यापीठ असावे अशी कल्पना मांडली. १९६७ साली चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल या तालुक्याच्या गावापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये सोमनाथ प्रकल्पाची सुरुवात झाली आणि श्रमसंस्कार छावणीची मुहूर्तमेढही रोवली गेली. भारतभरातून भारलेल्या युवक-युवतींचे तांडे या प्रकल्पात श्रमाचे संस्कार घेण्यासाठी येऊ लागले. १५ मे १९६७ रोजी पहिले श्रमसंस्कार शिबीर बाबांनी आयोजित केले.
७० च्या अस्वस्थ दशकात अस्वस्थ तरुणाईला एकत्र येण्याचे एक माध्यम हवे होते.  मुक्त, खुल्या संवादासाठी एक व्यासपीठ हवे होते. तरुणांना आपले विचार तर्कावर घासून पाहायचे होते. स्वतच्या जीवनाची आणि कार्याची दिशा ठरवायची होती. विचार वेगळे असतानाही किमान सहमतीच्या मुद्दय़ांवर आधारित एकत्र काम कसे करायचे, याबद्दल अनेकांच्या मनात संदिग्धता होती. बाबांच्या छावणीने या अस्वस्थतेला व्यक्त व्हायला एक सक्षम, खुले व्यासपीठ दिले. या सर्वाना श्रमसंस्काराचा वसा देण्यासाठी बाबांनी कोणताही ‘इझम्’ या छावणीला चिकटवला नाही. बाबांना स्वतचा नवा संप्रदाय किंवा ‘फॅन क्लब’ तयार करून इतरांविषयी अविश्वास वा नकारभाव पेरायचा नव्हता. एकमेकांच्या सहवासाशिवाय आणि परस्परांना नीट समजून घेतल्याशिवाय एकत्र येऊन रचनात्मक किंवा संघर्षांत्मक काम करू शकत नाही किंवा ते टिकवूही शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. बाबांनी कधीच कुणाला नाकारले नाही. त्यामुळे सर्व विचारधारांचे युवक बाबांच्या छावणीत यायचे. एकमेकांकडून बरेच काही शिकायचे. काही स्वीकारायचे, काही नाकारायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबांचा कठोर श्रमांवर आधारित कर्मवाद त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानच बदलून टाकीत असे. ‘मणभर बाष्कळ गप्पांपेक्षा अर्थपूर्ण लहानशा कृतीतूनच मानव्य साकारते’ हे बाबांचे तत्त्वज्ञान तरुणाईला भावायचे. त्यामुळे भेदाभेद, तोडफोड, प्रतिक्रियावादाऐवजी रचनात्मक पायावरील श्रमवाद आणि एकात्मतेचा भाव या शिबिरांमधून बाबांनी भारलेल्या या युवावर्गाला दिला. परिस्थिती आणि इतरांशी समायोजन या छावण्यांनीच तरुणांना शिकविले. 
सुरुवातीची आठ वष्रे हे शिबीर एक महिना चालायचे. वैदर्भीय तप्त हवामानात बाहेरच्या युवक-युवतींनी यावे, परिवर्तनाच्या टप्प्यावर नवे सामाजिक बदल त्यांनी स्वीकारावे आणि मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी घामात निथळवणारे श्रम करावेत, अशी संकल्पना सुरुवातीपासूनच रुजली. शिबिराची संवादभाषा ही राष्ट्रभाषा हिंदी होती. भारतातील उत्तरेकडील काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहारपासून ते दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतले युवक-युवती या शिबिरांना १९६७ पासूनच येत राहिले. बंगाल, आसाम, ओरिसा इत्यादी पूर्वोत्तर राज्यांतून १९७३ नंतर तरुणाई येऊ लागली आणि या बहुभाषिक शिबिरार्थीमुळे या शिबिरास जणू लघू भारताचेच रूप येऊ लागले.
शिबिरात येण्यासाठी आगाऊ नोंदणी श्रेयस्कर ठरते. छावणीचा कालावधी १५ मे ते २२ मे असतो. १४ मे रोजी भारतभरातून युवक-युवतींचे जथ्थे सोमनाथ प्रकल्पात दाखल होतात. १५ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ध्वजारोहणाने श्रमसंस्कार छावणी सुरू होते. भारत जोडोचे, श्रमप्रतिष्ठेचे नारे दिले जातात. हिंदी-मराठीसह बहुभाषिक प्रेरणागीते ताल-सुरात गात तरुणाईचा श्रमयज्ञ सुरू होतो. ‘नौजवान आओ रे, नौजवान गाओ रे, लो कदम मिलाओ रे, लो कदम बढाओ रे’ अशी किमान पाच-सहा गीते शिबिरात सहज पाठ होऊन जातात. सकाळी ६.३० पासून श्रमदानाला सुरुवात होते. कुदळ, फावडे, पाटी आदी साहित्य घेऊन शिबिरार्थी कामाच्या जागी निघतात. शिबिरादरम्यान सात दिवसांच्या काळात श्रमातून एखाद्या तलावाचे खोलीकरण, नाल्याची बांधबंदिस्ती, वृक्षलागवडीसाठी खड्डे करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. छावणीमुळे राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, सामाजिक जाणिवा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तरुणांमध्ये अंकुरतो. सकाळी तीन तास श्रमानंतर दुपारच्या सत्रात बौद्धिक व्याख्याने होतात. यात प्रत्यक्ष सामाजिक विकासाच्या, परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय असणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांशी तरुणाईचा थेट संवाद होतो. गेल्या ४५ वर्षांत अनेक दिग्गजांनी शिबिरातल्या मुलांसोबत अशा प्रकारे संवाद साधला आहे. संध्याकाळच्या सत्रात शिबिरार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हे शिबीर शेती, जंगल, जमीन, गरीब व वंचितांशी तरुणाईचे नाते जोडते. प्रत्येकाला दुसऱ्या जिल्ह्य़ातील वा राज्यातील मित्र देते. येथे श्रमणारी मने आपोआप नम्र, अंतर्मुख आणि रचनात्मक होतात. आपला देश आणि समाज समजून घेण्याची दुर्मीळ संधी ही छावणी देत असते.
आता बाबा आणि साधनाताई हयात नाहीत; पण डॉ. विकास आणि डॉ. भारतीताई आमटे ही दुसरी पिढी छावणीत शिबिरार्थीना भेटते. विकासदादा या तरुणाईत रमतात. आज आनंदवनाची नवी पिढी नवीन वाटा मळते आहे. नवा वारसा तयार करते आहे. आनंदवन आता आपल्या नव्या युवा संचासह छावणीच्या आयोजनात व्यस्त आहे. यंदाचे शिबीर काही नव्या संकल्पनांसोबत राबविले जाईल. शिबिरार्थीना सेवाकार्याच्या नव्या जागा आणि साधनजुळणीची कौशल्ये ज्ञात करून दिली जातील. प्रत्यक्ष सेवाकार्यानुभवासाठी आपल्या आयुष्यातील काही काळ कोणी देणार असेल तर त्यास योग्य ती संस्था आणि सेवाकार्य सुचविणे, धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांशी नियमित संवाद वाढविण्याची योजना, इतर युवा शिबिरे व छावण्या यांच्याशी संवाद व सामूहिकरीत्या तरुणाईसोबत राबविण्याची कार्ययोजना आखणे असे बरेच काही यावर्षीच्या छावणीच्या निमित्ताने योजले आहे, अशी माहिती शिबिराचे संयोजक कौस्तुभ आमटे यांनी दिली. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणाईने नावनोंदणीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधावा- कौस्तुभ विकास आमटे, सहाय्यक सचिव- महारोगी सेवा समिती, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, पिन- ४४२९१४. भ्रमणध्वनी- ९८६९३३३४८८/ ९५५२५८२२१५. ई-मेल : somnathcamp@gmail.com

No comments:

Post a Comment